Pages

धर्मापूरीगड




किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: उपलब्ध नाही
डोंगररांग: डोंगररांग नाही
श्रेणी: सोपी
जिल्हा: बीड
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हे प्राचीन गाव तेथील ब्राम्हणी (हिंदू) लेणी व योगेश्वरी देवीच मंदिर यामुळे प्रसिध्द आहे. आंबेजोगाई पासून २७ किमी अंतरावर धर्मापूरी नावाच एक प्राचीन धर्मक्षेत्र आहे. या गावात चालुक्य कालिन प्राचीन केदारेश्वर मंदिर याची साक्ष देत आजही उभ आहे. या गावात मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला. हा किल्ला धर्मापूरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले आहेत त्यात मंदिरांवरील अनेक शिल्प पहायला मिळतात. या वरून या गावात अनेक मंदिरे होती व त्यांचेच दगड वापरून हा किल्ला बांधला गेला. धर्मापूरीचा किल्ला व अप्रतिम कोरीव शिल्पे असलेले केदारेश्वर मंदिर ही दोनही ठिकाण आवर्जून पाहाण्यासारखी आहेत.

पहाण्याची ठिकाणे :
धर्मापूरी गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत जाऊ शकतो. किल्ला हा गावा मागील छोट्याश्या उंचवट्यावर उभारलेला आहे. किल्ल्याची तटबंदी मात्र उंचवट्याच्या खालपासून बांधून काढलेली आहे. किल्ल्याला ऎकेरी तटबंदी आहे. तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात ९ अष्टकोनी बुरुज आहेत. चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे २ दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी तेवढ्याच भागात परकोट बांधलेला आहे. या परकोटाच्या तटबंदीत छोटे पूर्वाभिमूख प्रवेशव्दार आहे. तेथून पायर्या चढून वर जाऊन काटकोनात वळल्यावर किल्ल्याचे मुख्य पूर्वाभिमूख प्रवेशव्दार आहे. हा १० फूटी दरवाजा सध्या दगडानी अर्धा बंद केलेला आहे. दरवाजा समोरील बुरुजावर व तटबंदीत फूले, नक्षी, व्याल यांची शिल्पे आढळतात. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. या देवड्यांवर व्यालमुखाच्या पट्टया बसवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरल्यावर उजव्या हाताला दोन तटबंदी लगत दोन खोल्या बांधलेल्या आहेत. या खोल्यांवरून पुढे गेल्यावर तटबंदीला लागून एक अप्रतिम चौकोनी विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या आहेत. दुसर्या पायरीवर कमलपुष्प कोरलेले आहे. २५ पायर्या उतरल्यावर मार्ग काटकोनात वळतो. इथे दगडात बांधलेल्या दोन कमानी आहेत. सर्वात खालच्या पायरीवर व भिंतीवर किर्तीमुख कोरलेले आहे. उपसा नसल्याने विहिरीचे पाणी खराब झालेले आहे.
विहिर पाहून बाहेर आल्यावर समोरच्या तटबंदीवर जाणारा जिना दिसतो व बाजूला तटबंदी लगत काही कमानी दिसतात.या कमानी म्हणजे रहाण्यासाठीच्या खोल्या असून या खोल्यांमागे तटबंदीत २ संडास बनविलेले पहायला मिळतात. यांची रचना सिंधुदुर्गावरील शौचालयासारखी आहे. या खोल्या पाहून बुरुजावर जाणार्या जिन्याकडे जावे . येथे तटबंदीतील एका दगडावर उड्डाण करणार्या मारूतीचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली चोर दरवाजा आहे. पण माती पडल्यामुळे हा मार्ग सध्या बंद झाला आहे. पण तटबंदीच्या बाहेरून चोर दरवाजा पहाता येतो. जिन्याने बुरुजावर गेल्यावर तिथे एका पीराचे थडगं पहायला मिळते. तटबंदीवरून प्रवेशव्दाराकडे येतांना डाव्या बाजूला किल्ल्याच्या खाली असलेल्या रस्त्याच्या कडेला काही नागशिल्प दिसतात. तटबंदीला असलेल्या जिन्याने प्रवेशव्दाराजवळ उतरावे. किल्ल्यातून बाहेर पडून नागशिल्पांकडे जातांना तटबंदीत बाहेरच्या बाजूने एक भवानी देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे. त्यावर नक्षी व खालच्या बाजूस काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. ते पाहून परत रस्त्यावर येऊन नागशिल्पाच्या पुढे जाऊन तटबंदी पर्यंत चढून जावे. या ठिकाणी चोर दरवाजा आहे. या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे. महिरपीच्या वरच्या बाजूस दोन कोनाड्यात दोन व्यालमुख आहेत. दरवाजा समोर व्यालाची पूर्णाकृती मूर्ती पडलेली आहे. हे पाहून झाल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. तटबंदी बाहेरील दोनही ठिकाणे झाडीत लपलेली असल्याने शोधणे कठीण जाते, त्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी.
केदारेश्वर हे प्राचीन मंदिर गावा बाहेरील शेतात आहे. मंदिरावर अप्रतिम शिल्प कोरलेली आहेत. मंदिराच्या परीसरातही अनेक शिल्प पडलेली आहेत.

पोहोचण्याच्या वाटा :
१) मुंबई, पुण्याहून आंबेजोगाई जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. आंबेजोगाई - धर्मापूरी अंतर २७ किमी आहे. खाजगी गाडीने किंवा रिक्षाने धर्मापूरीला जाता येते. वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
२) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर - आंबेजोगाई हे अंतर ६५ किमी आहे.
३) मुंबई, पुण्याहून रेल्वेने परळी वैजनाथ किंवा परभणी गाठावे. परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक आहे. परळी वैजनाथ ते आंबेजोगाई २५ किमी व आंबेजोगाई -धर्मापूरी २७ किमी अंतर आहे. परभणी ते आंबेजोगाई ९५ किमी अंतर आहे.

राहाण्याची सोय:
धर्मापूरी गावात राहण्याची सोय नाही. आंबेजोगाई आणि परळी वैजनाथ येथे रहाण्याची चांगली सोय आहे.
जेवणाची सोय:
धर्मापूरी गावात जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय:
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
किल्ला पहाण्यासाठी अर्धा तास लागतो.

सूचना :
१) धर्मापूरी पासून २७ किमीवर असलेल्या आंबेजोगाई येथे प्राचीन हिंदू लेणी (हत्तीखाना) व योगेश्वरी मंदिर पहायला मिळते.
२) आंबेजोगाई पासून २५ किमी अंतरावर परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक जोर्तिलिंग आहे.
३) धर्मापूरी पासून आंबेजोगाई मार्गे ५२ किमीवर धारूर किल्ला आहे.
४) धर्मापूरी पासून किनगाव , अहमदपूर मार्गे ७७ किमीवर उदगीर किल्ला आहे.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।