Pages

सामानगड




किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: ३००४ मीटर
डोंगररांग: कोल्हापूर
श्रेणी: मध्यम
जिल्हा: कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हयाच्या दक्षिणेस राखणदाराच्या रुपात किल्ले सामानगड उभा आहे विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्याच्या बेचक्यात अगदी मधोमध याचे स्थान असल्याने रसद पुरवठयाच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व फार आहे. कदाचित यावरुनच या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे.

इतिहास :
कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनिस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या भागाची सबनीसी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामान गड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठयांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामान गडाने इंग्रजाविरुध्द प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.

पहाण्याची ठिकाणे :
गडहिंग्लजवरुन भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पठारावर पायउतार व्हायचे. चिंचेवाडी गावातील भल्यामोठया विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते.डाव्या बाजूच्या सडकेने आपण गडावर प्रवेश करायचा. या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे. त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरुज बांधलेले आहेत.
गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने आपण गडाच्या तटावर जायचे व तटावरुनच निशाण बुरुजाकडे जायचे. येथून पुढे उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपण जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोहोचतो. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. विहिर चौकोनी आकाराची आहे. विहिरीजवळून पुर्व दिशेला गेल्यावर अंबाबाईचे कौलारु मंदिर लागते. मंदिराला लागून बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत.
अंबाबाई मंदिराच्या उजवीकडून पुढे गेल्यावर कमान बाव लागते. या विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या असून, पायर्‍यावर सुंदर कमानी आहेत. पायर्‍या संपल्यावर भुयार लागते, त्यापुढे पाणी लागते. या ठिकाणी सात कमानी आहेत. यापुढे आपणास जाता येत नाही. या ठिकाणी पुर्वी कैदयांना ठेवले जात होते. अशा आणखी ३ विहिरी सामानगडावर आहेत. या वैशिष्यपूर्ण विहिरी हे सामानगडाचे भूषण आहे.
कमान बाव पाहून आपण मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडीकडील तटावर जायचे. या तटावरुन जाताना तटाच्या बाहेर आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब आपणांस दिसतात. त्याचे प्रयोजन अदयाप कळलेले नाही. पुढे आपणांस चोर दरवाजा लागतो. येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंडया बुरुज लागतो. सोंडया बुरुजासमोर मुगल टेकटी दिसते. ती मुगल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली आहे अशी अख्यायिका स्थानिक लोकात आहे.
गड पाहून झाल्यानंतर गडावरुन सरळ जाणार्‍या सडकेने १५ मिनिटात आपण मारुती मंदिर गाठायचे. या मंदिरासमोर कातळात कोरुन काढलेली लेणी आहेत. या लेण्याच्या पायर्‍या उतरुन आत गेल्यावर महादेव मंदिर दिसते. मंदिरात मोठे शिवलिंग व अनेक कमानीदार देवळया आहेत. येथून उतरणार्‍या डांबरी सडकेने पुढे गेल्यावर आपणांस भीमशाप्पांची समाधी लागते, येथे स्वच्छ पाण्याचे कुंड आहे.
पोहोचण्याच्या वाटा:
स्वत:चे वाहन असल्यास गडहिंग्लज मार्गे भडगाव चेन्नकुपी गाठायचे. चेन्नकुपी मार्गे चिंचवाडी आणि मग सामानगडला पोहोचता येते.
राहाण्याची सोय:
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय:
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी
पाण्याची सोय:
गडावरील विहिरीत अथवा तलावात पिण्यायोग्य पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे १.५ ते २ तास.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।