Pages

नरनाळा




किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: ३१६१ मीटर
डोंगररांग: सातपुडा (मेळघाट)
श्रेणी: सोपी
जिल्हा: अमरावती
नरनाळा अभयारण्य हे विर्दभातील प्रसिध्द असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. याच अभयारण्यत नरनाळा किल्ला आहे. नरनाळा किल्ला तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला आहे. यातील पूर्वेकडील (उजवीकडील) गडाला "जाफराबादचा किल्ला" , मधील गडाला "नरनाळा" व पश्चिमेकडील(डावीकडील) गडाला "तेलीया गड" म्हणतात. यातील जाफराबाद किल्ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या "कोअर एरीयात" गेल्यामुळे पाहाता येत नाही, तर तेलीया गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. हे तीनही किल्ले नरनाळा अभयारण्यात येत असल्यामुळे त्यांना वनसंरक्षण कायदा व पूरातत्व कायदा या दोनही कायद्यांचे संरक्षण लाभल्यामुळे किल्ल्यावरील वास्तू सुस्थितीत आहेत, पण त्याच बरोबर जंगलाचा विळखा या वास्तूंभोवती पडत आहे.
नरनाळा अभयारण्यात प्रवेश करण्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ आहे. संध्याकाळी ५.०० वाजल्या नंतर नरनाळा अभयारण्यात थांबता येत नाही. हे अभयारण्य दर मंगळवारी व राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी बंद असते. नरनाळा अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी गाडीचे व माणसांचे प्रवेशशुल्क भरावे लागते. नरनाळा किल्ल्याचा घेर मोठा असल्यामुळे किल्ला संपूर्ण पहाण्यासाठी एक अख्खा दिवस लागतो. तेथे भेटलेल्या वनाधिकार्‍याच्या सांगण्यानुसार नरनळा किल्ल्याचाही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या "कोअर एरीयात" लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा किल्ला सुध्दा गडप्रेमींना पहाणे अशक्य होईल.

इतिहास :
आज अस्तित्वात असलेल्या नरनाळा किल्ल्याचा एतिहासिक कागदपत्रातील पहिला उल्लेख " तारिख-ए-फरीश्ता" या ग्रंथात आढळतो. या किल्ल्याची दुरुस्ती इ.स.१४२५ मध्ये बहामणी घराण्यातील नववा राजा अहमदशहा वली याने केल्याचा तो उल्लेख आहे . पुढे इ.स. १४८८ मध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याच्या ताब्यात नरनाळा किल्ला आल्यावर त्याने या किल्ल्याची दुरुस्ती केली व विस्तार केला. इमादशाही घराण्याच्या मूळ पुरूष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क हा मूळचा विजयनगर साम्राज्यातील ब्राम्हणाचा मुलगा होता. बहामनी राज्याच्या बेरार (वर्‍हाड) प्रांताचा सेनापती खान-ए-जहानचा खास मर्जीतील हा मुलगा पुढे बहामनी राज्याचा सेनापती बनला. बहामनीच्या पडत्या काळात त्याने इ.स. १४९० मध्ये गाविलगडावर इमादशाहीची स्थापना केली.
इमादशाही घराण्याने ९० वर्षे वर्‍हाड प्रांतावर राज्य केले. त्यानंतर १५७२ मध्ये गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले निजामशाहीत सामिल झाले.
इ.स.१५९८ मध्ये अकबराने नरनाळा किल्ला मुघल साम्राज्याला जोडला. परंतू मलिक अंबरने तो पुन्हा निजामशाहीत आणला. शहाजहानच्या काळात गाविलगड किल्ला पुन्हा मुघल साम्राज्यात गेला. इ.स. १७३८ मध्ये रघूजी भोसले यांनी शुजातखानचा पराभव करुन गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले ताब्यात घेतले. पण लवकरच हे किल्ले पुन्हा निजामाच्या ताब्यात गेले. निजाम व पेशवे यांच्यातील भांडणाचा फायदा घेऊन मुधोजी भोसले यांनी १७५२ मध्ये गाविलगड जिंकून घेतला.
१३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाल व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले.त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले.

पहाण्याची ठिकाणे :
नरनाळा किल्ला ३३२ एकरावर पसरलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी अंदाजे २४ किमी आहे. किल्ला २ भागात विभागलेला असून खालच्या भागात शहानुर दरवाजा , मेहंदी दरवाजा आणि महाकाली दरवाजा ही प्रवेशव्दारे आहेत ,तर वरच्या भागात इमारती व तलाव आहेत.
शहानुर दरवाजा:- नरनाळा किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी पूर्वीच्या काळी शहानुर दरवाजा , मेहंदी दरवाजा आणि महाकाली दरवाजा अशा तीन दरवाजांची माळ होती. शहानुर गावातून नरनाळा किल्ल्यावर जातांना अंदाजे ५ किमी वर " शहानुर दरवाजा " आहे. या दरवाजाच्या कमानीवर शरभ शिल्प कोरलेली आहेत, त्यामुळे या दरवाजाला "शेर दरवाजा" असेही म्हणतात. या काळ्या पाषाणात बांधलेल्या दरवाजाला तीन कमानी आहेत . दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत, तसेच छतावर कोरीवकाम केलेले आहे.
मेहंदी किंवा मेंढा दरवाजा :- शहानुर दरवाजाच्या पुढे साधारणत: १ किमी वर मेहंदी किंवा मेंढा दरवाजा आहे. या दरवाजाची कमान शाबूत आहे, पण बाजूचे बुरुज ढासळलेले आहेत.
महाकाली दरवाजा :- मेहंदी दरवाजाच्या पुढे काही अंतरावर "महाकाली"/ मुहम्मदी हा सुंदर व प्रशस्त दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस काळ्या दगडात बांधलेला प्रशस्त दरवाजा व बुरुज आहेत. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. त्यापुढे प्रशस्त मोकळी जागा आहे. त्याच्या बाजूने कमानी असलेला ओटा आहे. या भागाचा वापर कचेरीसाठी (चावडी) होत असावा. या ओट्यांखाली तळघर आहे, तसेच प्रवेशव्दारावर जाण्यासाठी जीना या ओट्यांवरूनच काढलेला आहे. या ओट्यांच्या शेवटी तपकीरी रंगाच्या दगडात बांधलेले महाकाली प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस बुरुज असून त्यात अप्रतिम कोरीव काम केलेले गवाक्ष आहेत. संपूर्ण प्रवेशव्दाराची उंची ३७ फूट असून कमानीची उंची १५ फूट आहे.
महाकाली प्रवेशव्दारावर फारसीत कोरलेला चार ओळींचा शिलालेख आहे. हा सुलेखनाचा (कॅलिग्राफीचा) अप्रतिम नमुना आहे. दुरून पाहील्यास हा शिलालेख न वाटता पानाफुलांची (वेलबुट्टीची) नक्षी वाटते.हा शिलालेख इ.स. १४८७ मध्ये हा शिलालेख कोरलेला आहे. त्याच्या वर दोन्ही बाजूस छोट्या खिडक्या आहेत. प्रवेशव्दारावर दगडात कोरलेली फुले आहेत.
महाकाली दरवाजातून बाहेर पडल्यावर डावीकडे व उजवीकडे अशा दोन वाटा फुटतात. प्रथम त्यापैकी उजवीकडील वाट पकडावी. काही अंतर चालून गेल्यावर वाटेत एक दगडी रांजण आहे.त्याच्या पुढेच एक बुरुज आहे.या बुरुजावर जाण्यासाठी जीना आहे. हे सर्व पाहून पुन्हा महाकाली दरवाजापाशी यावे. तेथून डावीकडे जाणारी वाट पकडावी. थोड्या अंतरावर डाव्या बाजूस सावरवली बागची आणि गज बहादूर वली यांची घुमटाकृती कबर आहे.
राणी महाल :- कबरीवरून पुढे जाणारी चढाची वाट १५ मिनीटात एका छोट्या दरवाजापाशी पोहोचते. हा दरवाजा ओलांडून गेल्यावर अंबर महाल/अंबा महाल/ राणी महाल/बारादरी ह्या नावांनी ओळखली जाणारी भव्य वास्तु दिसते. ही इमारत १९ मीटर * ६ मीटर आकाराची असून, तीला तीन कमानी आहेत. इमारतीत हवा खेळती रहावी म्हणून ८ झरोके आहेत. तसेच भिंतींमध्ये कोनाडे आहेत. इमारतीला ३ घुमट असून त्यांच्या आतील बाजूस कोरीवकाम केलेले आहे. पूर्वीच्या काळी त्यावर निळ्या रंगाचा लेप होता, परंतू आता एक दोन ठिकाणीच तो पाहायला मिळतो.या इमारतीवर जाण्यासाठी जीना आहे. इमारती खाली तळघर आहे,(स्थानिक लोक याला भूयार म्हणतात.) परंतू तेथे जाण्याचा मार्ग आता बंद झाला आहे.
राणी महालासमोर फरसबंदी केलेले पटांगण आहे. त्यात मध्यभागी कारंजे आहे. याशिवाय दगडी रांजण व मंडप घालण्यासाठी केलेली छिद्रे येथे पाहायला मिळतात. अंबर महालाच्या बाजूस मशिद आहे
शक्कर तलाव :- .राणी महालासमोरील पटांगण ओलांडल्यावर आपण शक्कर तलावापाशी पोहोचतो. या तलावाच्या काठावर बुर्‍हाणउद्दीन पीराचे थडगे आहे. थडग्यावर फार्सी शिलालेख कोरलेला आहे. या स्थानाला पीर/ कुत्तरदेवाचे ठिकाण म्हणून ओळखतात. शक्कर तलावात आंघोळ करून पीरा जवळ काही विधी केल्यावर कुत्रा चावलेला माणूस बरा होतो अशी येथील लोकांची अंधश्रध्दा आहे. या तलावाबाबत अनेक दंतकथा ही प्रचलीत आहेत.
नरनाळ्यावरील सर्वच तलाव हे "रेन वॉटर हारवेस्टींग" तंत्राचा वापर करून बांधलेले आहेत. उतारावरून वाहाणारे पाणी बोगदे खणून, कातळात उतार कोरून तलावात आणलेले आहे. पीराजवळ उभे राहीले असता उजव्या बाजूस उतारावरून वाहाणारे पाणी तलावात वळवण्यासाठी बांधून काढ्लेला कमानदार बोगदा पाहायला मिळतो, तर डाव्या बाजूस पाणी वळवण्यासाठी कातळात उतार कोरून काढलेला पाहायला मिळतो. या कातळावर एक छोटा दरवाजा आहे.
शक्कर तलावावरून दोन वाटा फूटतात. उजवीकडील वाट अंबरखान्याकडे (तेल तुपाचे टाके) जाते, तर डावीकडील वाट डांबरी रस्त्याकडे (घोड्याच्या पागा) जाते. प्रथम उजवीकडील वाट पकडावी.
अंबरखाना (तेल तुपाचे टाकं):- शक्कर तलावावरून उजवीकडे वळल्यावर थोड्या अंतरावर तीन कमानी आपले लक्ष वेधून घेतात. या कमानी एका दगडी बांधीव टाक्यावर उभारलेल्या आहेत. या टाक्यांना तेल तुपाचे टाकं असे म्हणतात. या टाक्यामध्ये भिंती बांधून त्याचे तीन भाग करण्यात आलेले आहेत. टाकं वरून बंद केलेले असून त्याला वरील बाजूस तीन झडपा (दरवाजे) ठेवलेल्या आहेत. या टाक्यांचे कड्याजवळील स्थान व रचना पाहाता या टाक्याचा उपयोग तेल तुप साठवण्यासाठी नसून धान्य साठवण्यासाठी केला जात असावा.
अंबरखान्यावरून पुढे गेल्यावर डाव्या हाताला दारुखान्याची इमारत आहे. तेथून किल्ल्याच्या कडेकडेने थोडे पुढे गेल्यावर एक प्रचंड तोफ दिसते ,तीला नौगजी तोफ म्हणतात.
नऊगजी तोफ :- किल्ल्याच्या पश्चिम टोकावर एक प्रचंड दक्षिणमुखी तोफ आहे. हि तोफ १८ फूट लांब असून तीचा परीघ ६ फूट आहे. तोफेच्या लांबीवरूनच तीला नऊगजी तोफ हे नाव पडले आहे. या तोफेवर फारसी लेख कोरलेला आहे. या तोफेजवळील कड्यावरून खालील बाजूस किल्ल्याचा अजून एक दरवाजा दिसतो.
नऊगजी तोफेवरून किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने (डोंगराच्या कडेकडेने) पुढे चालत गेल्यावर १० मिनीटात आपण दमयंती तलावापाशी (सागर तलाव) पोहोचतो. येथे दोन रस्ते फूटतात. एक रस्ता जाफराबाद किल्ल्याच्या दिशेला (पूर्वेला) जातो , तर दुसरा रस्ता मागे वळून राम तलावाच्या दिशेला जातो. आपण प्रथम जाफराबाद किल्ल्याच्या दिशेने जावे. वाटेत उजव्या बाजूस किल्ल्याची तटबंदी व बुरुज आपली साथ करतात, तर डाव्या हाताला एक चौकोनी बुरुज पाहायला मिळतो. रस्त्यात वनखात्याने प्राण्यांसाठी बांधलेले पाणवठा पाहायला मिळतो. या पाणवठ्याच्या पुढे पाउलवाटेच्या दोनही बाजूला दोन बुरुज आहेत. तेथून पुढे गेल्यावर आपण एका बांधीव तलावापाशी पोहोचतो. येथे पायवाट संपलेली आहे. तलावाच्या बाजूला वनखात्याने बांधलेले लपण व वॉचटॉवर आहे, त्यावरून किल्ल्याचे विहंगम दृश्य दिसते.
हे सर्व पाहून परत फिरावे व दोन रस्ते फूटतात त्या फाट्यावरून राम तलावाच्या दिशेला जावे. वाटेत उजव्या हातास खालच्या बाजूला एक दरवाजाची कमान दिसते. खाली उतरून गेल्यावर या दरवाजाची भव्यता कळते. हा उत्तरेला असलेला दरवाजा " दिल्ली दरवाजा" या नावाने ओळखला जातो. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत.
मोती तलाव (मोठा तलाव) :- दिल्ली दरवाजाच्या पुढे हा बारमाही तलाव असून याच्या एका बाजूला कमान आहे.
म्हसोबाचा ओटा :- मोती तलावाला वळसा घालून गेल्यावर एका झाडाखाली मारुतीची दगडात कोरलेली मुर्ती व सती शिळा पाहायला मिळते. येथून थोडे पुढे गेल्यावर म्हसोबची दगडात कोरलेली मुर्ती पाहायला मिळते यालाच म्हसोबाचा ओटा म्हणतात. या परीसरात अनेक वीरगळी व सती शिळा आहेत पण दाट झाडीमुळे (या परीसरात खाजखुजलीची बरीच झाडे आहेत) त्या पाहायला मिळत नाहीत.
राम तलाव (धोबी तलाव) :- म्हसोबाचा ओटा पाहून पुन्हा मुख्य वाटेला लागल्यावर उजव्या बाजूस राम तलाव आहे. हा बारमाही पाण्याचा तलाव भोसल्यांच्या राजवटीत या तलावाजवळ बगिचा होता व त्याला दगडांच्या पन्हाळी व्दारे पाणी देण्याची व्यवस्था होती.
राम तलाव पाहून इमली तलावाच्या बाजूने ५ मिनीटात आपण गेस्ट हाऊस पाशी पोहोचतो. येथ पर्यंत डांबरी रस्ता आलेला आहे. या रस्त्याने खाली उतरायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूस शक्कर तलाव दिसतो , तर डाव्या बाजूस मशिद , घोड्याच्या पागा, गजशाळा व इतर वास्तू पाहायला मिळतात.
येथे आपली गडफेरी पूर्ण होते. याशिवाय गडावर खम तलाव ,चंद्रावती तलाव, शिरपूर दरवाजा, खूनी बुरुज , कैदखाना, इत्यादी पाहाण्यासारखी ठिकाणे आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
अकोला हे विर्दभातील प्रसिध्द शहर आहे. तसेच अकोला हे मध्य रेल्वेच्या मुंबई - नागपूर मार्गावरील प्रनुख स्थानक आहे. अकोल्या पासून नरनाळा किल्ला ६६ किमी वर आहे. अकोल्याहून ४० किमी वर अकोट हे तालुक्याचे गाव आहे. अकोटहून पोपटखेड मार्गे शहानुर हे नरनाळा किल्ल्याचे गाव २० किमी वर आहे. शहानुर गावाताच वनखात्याची चौकी आहे. तिथे पावती फाडून ६ किमी वरील नरनाळा गडावर वहानाने किंवा चालत जाता येते.

राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही, पण अकोला, अकोट किंवा शहानुर गावात निवासाची सोय आहे. शहानुर गावात वनखात्याची व खाजगी निवासाची सोय आहे, पण त्यासाठी आगाऊ आरक्षण करावे लागते.

जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, परंतू शहानुर गावात जेवणाची सोय आहे. किल्ला संपूर्ण पाहाण्यास अख्खा दिवस लागतो, त्यामुळे बरोबर खाण्याचे साहित्य बाळगावे

पाण्याची सोय :
गडावरील तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे, पण पाण्याचा साठा सोबत असल्यास उत्तम.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
शहानुर या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातून चालत गडावर पोहोचण्यास २ ते अडीच तास लागतात. किल्ला संपूर्ण पाहाण्यास पूर्ण दिवस लागतो.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हेंबर ते फेब्रूवारी हा किल्ल्यावर जाण्याचा उत्तम काळ आहे.

सूचना :
१) नरनाळा किल्ला प्रचंड मोठा असल्यामुळे भाड्याच्या/ स्वत;च्या वहानाने शहानुर, मेहंदी दरवाजे पाहून गाडी महाकाली दरवाजा जवळ सोडून पुढचा किल्ला चालत पहावा व गाडी शक्कर तलावाजवळ बोलवून घ्यावी . यामुळे किल्ला व्यवस्थित व वेळेत पाहाता येतो.
२) नरनाळा अभयारण्यात येत असल्यामुळे त्यांना वनसंरक्षण कायदा व पूरातत्व कायदा या दोनही कायद्यांचे संरक्षण लाभल्यामुळे किल्ल्यावर फिरतांना सावधगिरी बाळगावी. झाडांच्या फांद्या तोडू नये ,जंगलातील कुठलीही( पाने, फुले, बीया इत्यादी) वस्तू जागेवरून हलवू नये, तसेच बरोबर आणू नये.
३) नरनाळा किल्ला पाहाण्यासाठी वनखात्याचा माणूस किंवा स्थानिक माणूस (वाटाड्या) घेतल्यास किल्ल्यावरील जंगलात विखुरलेले/ लपलेले अवशेष शोधणे शक्य होते.
४) नरनाळा किल्ला पहातांना नकाशा वापरल्यास सर्व किल्ला व्यवस्थित व कमी वेळात पहाता येतो.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।