किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: १९९५ मीटर
डोंगररांग: गाळणा टेकड्या
श्रेणी: मध्यम
जिल्हा: धुळे

महाराष्ट्रात अनेक शहरांना किल्ल्यांची
पाश्वर्भूमी लाभली आहे. अशाच अनेक शहरांपैकी एक शहर धुळे शहर आहे, अहिराणी ही या शहराची मुख्य भाषा आहे.
या भागातील किल्ले फिरण्याची मजा काही औरच कारण दिवसा येथील तापमान ४० पर्यत जाते, तर रात्री तेच १० ते १२ पर्यंत खाली
उतरते. येथील किल्ले फिरतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे येथे झाडांचे
प्रमाण फारच कमी आहे.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याचे साधारणपणे दोन भाग पडतात एक
बालेकिल्ला तर दुसरा किल्ल्याची माची. पडझड दरवाज्याच्या अगोदर डावीकडे कातळात
खोदलेल्या काही गुहा लागतात. यापैकी काही गुहांमध्ये राहाता सुध्दा येते.
प्रवेशव्दाराच्या खालून एक वाट किल्ल्याच्या माचीवर जाते. पण आपण माचीकडे नंतर
वळुया सध्या आपले लक्ष म्हणजे गडमाथा. प्रवेशव्दाराची सध्या बर्याच मोठ्या
प्रमाणावर पडझड झालेली आहे. व्दाराच्या उजव्या बाजूला एक व्याघ्रशिल्प कोरलेले
आहे. येथून वर चढून गेल्यावर उजवीकडे गडाची तटबंदी आहे. येथे काही बुरुजही आढळतात.
सध्या तटबंदी बर्याच प्रमाणात शाबूत आहे. ही तटबंदी पाहून पुन्हा
प्रवेशव्दारापाशी यावे. डावीकडची वाट धरावी २० ते २५ पावले पुढे गेल्यावर कातळात
खोदलेले पाण्याचे टाके आहे. हे पाणी पिण्यास जरी योग्य असले तरी त्याला कुबट असा
वास येतो. थोडे पुढे गेल्यावर पुन्हा पाण्याची काही टाकी खोदलेली आढळतात. येथून
पुढे बालेकिल्ल्याचे पठार सुरु होते. पठारावरच एक टेकाड उंचावलेले आहे. पठाराच्या
चहूबाजुंना तटबंदी आहे. काही ठिकाणी महिरपी युक्त तटबंदी सुध्दा आढळते.
टेकाडाच्या पोटात अनेक गुहा खोदलेल्या आहेत.
टेकाडावर चढून गेल्यावर एक दारुकोठाराची इमारत लागते. या कोठाराच्या मागच्या
बाजूला पाण्याचा मोठा खंदक आहे. तसेच दोन ते तीन पाण्याची टाकी सुध्दा आहेत. समोरच
ललिता मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर थोडी जागा आहे. मंदिराच्या मागच्या
बाजूला पुन्हा कातळात खोदलेल्या काही गुहा आहेत. येथून एक वाट एका भुयारात शिरते
पण चक्क ते भुयार नसून गडावरील गुप्तदरवाजा आहे. या गुप्त दरवाज्यातून खाली
उतरणारी वाट गडाच्या माचीवर घेऊन जाते.
गुप्त दरवाज्यातून खाली उतरत असतांना कातळात
खोदलेले पाण्याचे टाके लागते. येथून थोडे खाली उतरल्यावर वाट उजवीकडे वळते. वाटेतच
देवीचे एक पडके मंदिर आहे. मंदिराच्या समोरुन जाणारी ही वाट सरळ माचीवर जाते. या
माचीवर पाण्याचा एक भला मोठा तलाव आहे. समोरच एक घुमटी आहे.घुमटीच्या खालच्या
बाजूला पाण्याची दोन टाकी आहेत. किल्ल्याच्या माचीला सुध्दा काही ठिकाणी तटबंदी
आहे. माचीवर फेरफटका मारुन आपण तलावाला उजवीकडे ठेवून पुढे वर चढत जायचे. ही वाट
पुन्हा आपल्याला उध्वस्त प्रवेशव्दाराच्या जवळ घेऊन जाते. सर्व परिसर पाहून आल्या
मार्गाने परत लळिंग गावात उतरावे.
पोहोचण्याच्या वाटा :
लळिंग किल्ला हा धुळे - मालेगाव रस्त्यावर
धुळ्यापासून ८ किमी अंतरावर आहे. मुंबई - आग्रा महामार्ग किल्ल्याला लागुनच पुढे
जातो. लळिंग आणि सोनगिर ही एकाच सरळ रेषेत असणारे किल्ले आहेत. धुळयाहून मालेगावला
जाणारी कोणतीही एसटी पकडून लळिंगला जाता येते किंवा धुळ्याहून रिक्षेने सुध्दा
लळिंग गावात जाता येते. लळिंग हे किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाचे नाव सुध्दा आहे.
गावात महादेवाचे एक काळ्या पाषाणात बांधलेले मंदिर आहे. या मंदिराच्या मागे एक
पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खालूनच गडावर जाणारी वाट सुरु होते. येथून किल्ला
उजवीकडे ठेवत थोडे थोडे वर चढत जायचे. किल्ल्याची वाट लक्षात ठेवण्याची चांगली खूण
म्हणजे गडाची वाट आणि मुंबई - आग्रा महामार्ग समांतर आहे. शिवाय थोडे पुढे
गेल्यावर हीच वाट तटबंदी उजव्या बाजूला ठेवून वर सरकत जाते. थोड्याच वेळात आपण
किल्ल्याच्या पहिल्या पडझड झालेल्या दरवाजात पोहचतो.
राहाण्याची सोय:
१) गडावरील दारुकोठारात ४ ते ५ जणांची
राहण्याची सोय होऊ शकते.
२) प्रवेशव्दाराच्या अगोदर असणार्या काही
गुहांमध्ये १० जणांची राहण्याची सोय होऊ शकते. मात्र या गुहा बर्याच प्रमाणात
अस्वच्छ आहेत.
जेवणाची सोय:
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय:
प्रवेशव्दाराच्या जवळच पिण्याच्या पाण्याचे
टाके आहे. मात्र येथील पाण्याला कुबट असा वास येतो.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
लळिंग गावातून पाऊण तास लागतो.
No comments:
Post a Comment