Pages

कलानिधीगड




किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: ३३२९ मीटर
डोंगररांग: कोल्हापूर
श्रेणी: मध्यम
जिल्हा: कोल्हापूर

कलानिधीगड (कलानंदीगड)
सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो.
विशेष उल्लेखनिय गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्‌टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्‌टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत.

पहाण्याची ठिकाणे :
कलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी फारच देखणे आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. एका भागात दूरसंचार खात्याचा मनोरा आहे व उर्वरित भागात गडाचे अवशेष आहेत. दरवाज्यासमोर डाव्या हातास आपणास अनेक जुनी बांधकामे दिसतात. यातच दोन मंदिरे आहेत. पहिल्या मंदिरात शिवलिंग असून, त्यामागे भैरवाची मुर्ती आहे. दुसर्‍या मंदिरात गडाची अधिष्ठाता भवानी देवीची लहान परंतु सुबक व शस्त्रसज्ज मुर्ती आहे. या मंदिराच्या दारात वेगळया शैलीतील गणेशाची कलात्मक मुर्ती आहे. या मंदिरासमोर एक जुनी समाधी आहे.

मंदिरे पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायर्‍यांचा मार्ग खोल विवरात उतरताना दिसतो. येथे एका चौकोनी हौदात दोन विहिरी खोदलेल्या पहावयास मिळतात. यातील एक विहिर झाडांनी भरुन गेली आहे, तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिर संकुलात अनेक पायर्‍या, देवळया व चौथरे इत्यादी दिसतात. विहिर संकुल पाहून आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढून पुढे चालायचे, येथील उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणी एक भव्य बुरुज लागतो. यापुढील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी सडक बनविलेली दिसते. हा अपवाद सोडता संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. या सडकेने खाली उतरुन गडाकडे पाहिल्यास गडाच्या तटबंदीचे बुरुजांचे फारच मनोहारी दृष्य दिसते. दूरसंचार टॉवरकडील तटबंदीमध्ये आपणास जागोजागी शौचकूप दिसतात. दूरसंचार खात्याच्या कचेरी शेजारी आपणास जुना वाडा दिसतो. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदीच्या नागमोडी पात्राचे मोहक दर्शन होते. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.
पोहोचण्याच्या वाटा :
१) स्वत:चे वाहान असल्यास बेळगावला जायचे. तिथून शिनोळी - पाटणे फाटा मार्गे कालिवडे गावात जायचे. कालिवडे गावातून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.
२) जर स्वत:चे वाहन नसल्यास कोल्हापूरहून चंदगड गाठायचे. चंदगड वरून शिनोळी - पाटणे फाटा मार्गे कालिवडे गावात पोहोचता येते.
कलानिधीगड ज्या डोंगरावर वसला आहे, त्याची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. गड आटोपशीर असून उत्तम तटबंदीने वेढलेला आहे. कलिवडे गावातून गडावर वीजवाहिनी गेली आहे. तिची साथसोबत गडापर्यंत लाभते. कलिवडे गावापासून शेतातून जाणार्‍या वाटेने आपण गडाच्या पूर्व बाजूच्या उतारावर असलेल्या वस्तीवर पोहचतो. ही वस्ती पार करुन पुढे गेल्यावर गडावर जाणारा जांभ्या दगडातील पक्का रस्ता लागतो. हा रस्ता फिरुन गडावर जात असल्याने, आपण विद्युत ट्रान्सफॉर्मरजवळून उजव्या हाताने जाणार्‍या पायवाटेने चालू लागायच. डोंगराचा एक टप्पा चढून गेल्यानंतर एक खिंड लागते, ती ओलांडून आपण गडाचा डोंगर डाव्या हातास ठेवून, आणखी १५ मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या दरवाज्यात पोहचतो.

राहाण्याची सोय:
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय:
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय:
गडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
कलानिधीगडावर पोहोचण्यास कालिवडे गावातून १ तास लागतो.
सूचना:
महिपालगड आणि कलानिधीगड एकाच मार्गावर असल्याने ते एकाच वेळी करणे योग्य आहे, तसेच स्व्त:ची गाडी असल्यास दोनही गड एका दिवसात पाहून होतात.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।