Pages

चाकणचा किल्ला



चाकणचा किल्ला

किल्ल्याचा प्रकार: भुई किल्ले
किल्ल्याची ऊंची: ६४६ मीटर
डोंगररांग: डोंगररांग नाही
श्रेणी: सोपी
जिल्हा: पुणे

पूणे - नाशिक मार्गावर असलेला चाकणचा भूइकोट किल्ला उर्फ संग्रामगड हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग ५५ दिवस लढवल्यामुळे शिवचरीत्रात प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी चाकण हे घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्र होते. त्याच्या रक्षणासाठी चाकणचा भूइकोट बांधण्यात आला. या किल्ल्यावरुन घोटण, पौड या मावळांवर आणि घोडनेर, भीमनेर या नेरांवर नजर ठेवता येत असे. प्राचिन व दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या या किल्ल्याची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे.

इतिहास:
चाकणचा भूईकोट किल्ला हा प्राचिन किल्ला आहे. अनेक ऐतिहासिक प्रसंगांना साक्षी असलेल्या या किल्ल्यांचा ताबा देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीकडे गेला. त्यानंतर अल्लाउद्दीनशहा बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याचे निश्चित केले. ही कामगिरी मलिक उत्तुजारवर सोपवण्यात आली. त्याने चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले(१४५३). या मोहीमेत विशालगडावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मलिक उत्तुजारच्या सेनेला शिर्के व मोरे यांनी फसवून निबीड अरण्यात आणले व या मोक्याच्या जागी त्यांच्यावर अचानक हल्ला करुन मलिक उत्तुजार सह २५०० जणांची कत्तल केली. (गनीमी काव्याने लढल्यागेलेल्या या पहिल्या लढाइचा समग्र वृत्तांत वाचण्यासारखा आहे)
या मोहीमेत दक्षिणी मुसलमान व परकीय मुसलमान यांच्यात बेबनाव झाल्यामुळे दक्षिणेकडील मुसलमान मोहीम अर्धवट सोडून चाकणला परत आले. त्यांच्या भ्याड व फितूर वर्तनामुळे विशाळगड मोहीम अपयशी ठरली, असे परकिय मुसलमान बोलू लागले. हा आरोप शहाला कळला तर आपली धडगत नाही हे दक्षिणी मुसलमानांना कळल्यावर त्यांनी शहाला खबर दिली की, परकीय मुसलमानांनी चाकणच्या किल्ल्यावर कब्जा केला असून त्यांना कोकणच्या राजाची साथ आहे. शहा दारु पिऊन तर्र झाला आहे हे पाहून त्याला ही बातमी देण्यात आली. त्याने हुकूम दिला चाकणच्या किल्ल्यावर हल्ला करुन सर्व परकीय मुसलमानांना ठार मारावे. या आज्ञेनुसार दक्षिणी फौजेने चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला किल्ल्यातील परकीय मुसलमानांनी किल्ल्यातील सामग्री संपेपर्यंत वेढ्याला दाद दिली नाही. अखेरीस दक्षिणी मुसलमानांनी परकीय मुसलमानांना शहाने माफी केले आहे, असा बनावट हुकूम दाखवून त्यांना किल्ल्याच्या बाहेर काढले व त्यांना मेजवानीस बोलवले. जेवण चालू असतांना त्यांची कत्तल केली.
शिवाजी राजांचे पणजोबांचे(बाबाजी), वडील मालोजी व खेळोजी यांना दौलताबादचा सुभेदार अमिरशा याने चाकण चौर्‍यांशी परगण्याची जहागिरी दिली होती. पुढे चाकण प्रांत शहाजीराजांच्या जहागिरीत होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला, त्यावेळी फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. त्याने राजांशी निष्ठा व्यक्त केली व राजांनी त्याचीच किल्लेदार म्हणून नेमणून केली.
२१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाच्या २० हजार फौजेने चाकणच्या भूइकोटला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यात ६०० ते ७०० मराठे होते, धनधान्य व दारुसाठा पुष्कळ होता. मराठ्यांनी तोफा, बंदूकी व रात्रीचे मोगल सैन्यावर छापे घालून किल्ला भांडता ठेवला. दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहून शाहिस्तेखानाने इशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. वेढ्याचा ५५ वा दिवस १४ ऑगस्ट १६६०, या दिवशी भुयारात दारु भरुन बत्ती देण्यात आली. त्यावेळी झालेल्या प्रचंड स्फोटाने बुरुजाला खिंडार पडले, बुरुजावरील मराठे मारले गेले. मोगली सेना खिंडारातून किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करु लागली पण मराठ्यांनी त्यांना किल्ल्यात शिरकाव करु दिला नाही. १५ ऑगस्ट १६६० रोजी मोगलांनी निकराचा हल्ला केला. मराठे बालेकिल्ल्याच्या आश्रयाने लढले, पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत आली होती. त्यामुळे त्यांनी किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला.

पोहोचण्याच्या वाटा: मुंबई - तळेगाव - चाकण या मार्गाने चाकणला जाता येते.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।