Pages

रतनगड



किल्ले रतनगड (ता.अकोले, जि.अहमदनगर)

 सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे.
 भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.
 अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग
 आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो.

 साधारण दीड दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्‍या लागतात. या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्‍या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारात पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्‍या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत. संपूर्ण गडफेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.

 कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणि शिवलींग पहायला मिळते.इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे.
 गडाच्या इतिहासाबद्दल थोडेसे(मला मिळालेल्या माहितीनुसार).......
 इंग्रजांचे राज्य येण्यापुर्वी रतनगडास फार महत्व होते.अलंग,कुलंग,मलंग हे किल्ले आणि राजुर,सोकलीचा प्रदेश रतनगडाच्या अधिपत्याखाली येत होता.इ.स. १७६३ मध्ये जावजी या कोळी सरदाराच्या ताब्यात हा गड होता.कॅप्टन गोडार्डने या किल्ल्यावर १८२० मध्ये प्रत्यक्ष ताबा मिळवुन गडावरच आपला तळ ठोकला.पण त्याचा मुक्काम हलताच पूर्वीचा किल्लेदार गोविंदराव याने रामजी भंग्रियाच्या साथिने परत उठाव करुन रतनगड ताब्यात घेतला.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।