Pages

किल्ले पेडका




किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: २८२० मीटर
डोंगररांग: अजंठा सातमाळ
श्रेणी: मध्यम
जिल्हा: औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे त्याकाळात राजधानीकडे येणार्‍या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली होती. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले. त्यामुळे टेहळ्णीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले व आडमार्गावर असल्यामुळे यातील काही किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले. औरंगबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेला पेडका किल्ला यापैकी एक आहे.

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या पायथ्याशी पेडकावाडी धरण आहे. या धरणाच्या मातीच्या बांधावरून चालत आपण पेडका किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून किल्ल्याचा उत्तर - दक्षिण पसरलेला माथा दिसतो. यातील दक्षिणेकडील (डाव्याबाजूच्या) डोंगरमाथ्याला २ सोंडा आहेत. किल्ल्यावर जाणारी वाट या २ डोंगरसोंडां मधील घळीतून वर चढते. दुसरी डोंगरसोंड पहिल्या डोंगरसोंडेच्या मागे लपलेली असल्यामुळे पठारावर जाईपर्यंत ती दिसत नाही. त्यासाठी पायथ्यापासून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे चढत जावे. साधारणपणे ३० मिनिटात आपण पठारावर पोहोचतो. येथे गुराख्यांनी दगड एकमेकांवर रचून त्यांचा देव तयार केलेला आहे. येथून आपल्याला डोंगराच्या दोन्ही सोंडा दिसतात. या मधील घळीतून वर चढायला सुरुवात करावी. यातील दक्षिणेकडच्या (डाव्याबाजूच्या) सोंडेवर किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारापूर्वी २५-३० बांधीव व कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. पठारावरून प्रवेशव्दारापर्यंत पोहोचण्यास ४५ मिनिटे लागतात.
प्रवेशव्दार पश्चिमाभिमुख असून उध्वस्त झालेले आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर किल्ला ३ टप्प्यात (भागात) पसरलेला दिसतो. सर्वात खालच्या भागात म्हणजेच दक्षिणेकडे पसरलेल्या पठारावर काही वास्तुंचे चौथरे दिसतात. ते पाहून मागे वळून पश्चिमेच्या दरीकडे चालत जावे. येथे कातळाच्या पोटात खोदलेले टाक पाहायला मिळते. ते पाहून दरीच्या काठाकाठाने (दरी डाव्या बाजूला व डोंगर उजव्या बाजूला ठेवत) पुढे गेल्यावर उजव्या बाजूच्या कातळ भिंतीखाली कोरलेली २ खांब असलेली २ टाकी दिसतात. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाक पाहून परत मागे फिरुन वर चढायला सुरुवात करतांना एक सुकलेल पाण्याच टाक दिसत. त्याच्यापुढे म्हसोबाची देवळी आहे.
म्हसोबाच्या देवळीच्या बाजूने किल्ल्याच्या दुसर्‍या टप्प्यावर चढून गेल्यावर आपल्याला खालच्या बाजूला मोठ तळ व त्यामागिल ३ गुहा दिसतात. (चौथी गुहा आपण उभे असलेल्या पठाराच्या खालच्या बाजूला असून ती मोडकळीस आलेली आहे.) या गुहा २ खांबांवर तोललेल्या आहेत. गुहा प्रशस्त असून साफसफाई न केल्याने त्या रहाण्या योग्य नाहीत. या परीसरात २-३ ठिकाणी शेंदुर फासलेले दगड असून त्याच्या जवळ त्रिशुळ उभे करून ठेवलेले आढळतात.
पेडका किल्ल्यावर पाणी स्थिरीकरणाची योजना राबवलेली पाहायला मिळते. किल्ल्यातील मोठ्या तलावाच्या वर डोंगर पसरलेला आहे. या डोंगरावरून वहात येणारे पाणी थेट मोठ्या तलावात जाऊन तो गाळाने भरू नये यासाठी या तलावाच्या वर २ छोटे तलाव बनवलेले आहेत. सर्वात वरच्या पठारावर (माथ्यावर) असलेल्या तलावात पठारावरून वाहाणारे पाणी व गाळ जमा होतो. तो तलाव भरला की वरचे पाणी बाजूच्या पन्हाळीतून खालच्या बाजूला असलेल्या गुहे जवळील बांधीव तलावात येते. इथे पाण्याला पुन्हा एकदा स्थिर करून त्यातील गाळ खाली बसवला जातो. या तलावाच्या बांधाच्या एका कडेला वरच्या बाजूस पाणी जाण्यासाठी पन्हाळी बनवलेली आहे. त्यातून पाणी खालच्या मोठ्या तलावात जमा होते. यामुळे मोठ्या तलावात फारच कमी प्रमाणात गाळ जमा होतो. याशिवाय २ अतिरीक्त पाणी साठे तयार होतात आणि दरवर्षी वरच्या २ छोट्या तलावातील गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येतो.
किल्ल्याच्या तिसरा टप्पा म्हणजे किल्ल्याचा सर्वोच्च माथा. माथ्यवर साचपाण्याचा एक तलाव आहे. माथ्याच्या मध्यावर पीराच थडग आहे. तसेच एका वाड्याचा चौथरा ही पहायला मिळतो. गडावरून पूर्वेला चिवळी महादेवाचा डोंगर तर दक्षिणेला कण्हेरगड दिसतो. गडमाथा पाहून परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गडफेरीला १ तास लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
१) औरंगाबादहून :- औरंगाबाद शहरापासून कन्नड हे तालुक्याचे गाव ६५ किमी अंतरावर आहे. कन्नडहून किल्ल्याजवळील कळंकी गाव २० किमी अंतरावर आहे. कळंकी गावात जाण्यासाठी एसटी व खाजगी जीप गाड्यांची सोय आहे. कळंकीहून दिड तासाच्या चालीवर पेडका किल्ल्याचा पायथा आहे. किल्ल्याचा उत्तर - दक्षिण पसरलेला माथा दिसतो. यातील दक्षिणेकडील (डाव्याबाजूच्या) डोंगरमाथ्याला २ सोंडा आहेत. किल्ल्यावर जाणारी वाट या २ डोंगरसोंडां मधील घळीतून वर चढते. दुसरी डोंगरसोंड पहिल्या डोंगरसोंडेच्या मागे लपलेली असल्यामुळे पठारावर जाईपर्यंत ती दिसत नाही. त्यासाठी पायथ्यापासून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे चढत जावे. साधारणपणे ३० मिनिटात आपण पठारावर पोहोचतो. येथे गुराख्यांनी दगड एकमेकांवर रचून त्यांचा देव तयार केलेला आहे. येथून आपल्याला डोंगराच्या दोन्ही सोंडा दिसतात. या मधील घळीतून वर चढून डोंगरमाथा गाठावा.
२) चाळीसगावहून :- चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर चाळीसगावपासून २४ कि.मी. अंतरावर नायडोंगरी गाव आहे. (या गावातून राजदेहेर (ढेरी) किल्ल्याला जाणारा रस्ता आहे.) नायडोंगरी ते बोलठाण हे अंतर २८ कि.मी आहे. बोलठाण वरुन एक रस्ता ६ कि.मी वरील जेहुर गावात जातो. जेहूरहून ४ किमीवर पेडका गाव आहे. पेडका गावाच्या बाहेर पेडकावाडी धरण आहे. पेडका - कन्नड रस्त्यावर घाट सुरु होण्यापूर्वी डाव्या बाजूचा कच्चा रस्ता पेडकावाडी धरणाच्या भिंतीवर जातो.
या धरणाच्या मातीच्या बांधावरून चालत आपण पेडका किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून किल्ल्याचा उत्तर - दक्षिण पसरलेला माथा दिसतो. यातील दक्षिणेकडील (डाव्याबाजूच्या) डोंगरमाथ्याला २ सोंडा आहेत. किल्ल्यावर जाणारी वाट या २ डोंगरसोंडां मधील घळीतून वर चढते. दुसरी डोंगरसोंड पहिल्या डोंगरसोंडेच्या मागे लपलेली असल्यामुळे पठारावर जाईपर्यंत ती दिसत नाही. त्यासाठी पायथ्यापासून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे चढत जावे. साधारणपणे ३० मिनिटात आपण पठारावर पोहोचतो. येथे गुराख्यांनी दगड एकमेकांवर रचून त्यांचा देव तयार केलेला आहे. येथून आपल्याला डोंगराच्या दोन्ही सोंडा दिसतात. या मधील घळीतून वर चढून डोंगरमाथा गाठावा.

राहाण्याची सोय:
किल्ल्यावर रहाण्याची व्यवस्था नाही.
जेवणाची सोय:
किल्ल्यावर किंवा आसपास जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय:
किल्ल्यावरील खांब टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्या पासून पेडका किल्ल्यावर जाण्यासाठी १ ते दिड तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी: जुलै ते फेब्रुवारी

सूचना :
चाळीसगावाहून खाजगी वाहानाने सकाळीच निघून पेडका व राजदेहेर (ढेरी) हे दोनही किल्ले एका दिवसात पाहाता येतात

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।