Pages

अंतुर




किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: २७०० मीटर
डोंगररांग: अजंठा
श्रेणी: मध्यम
जिल्हा: औरंगाबाद
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा हा लेण्यांनी नटलेला आहे. या जिल्हातील जगप्रसिध्द अजंठा लेणी ही, सह्याद्रीच्या अजंठा रांगेत कोरलेली आहे. या अजंठा रांगेत अनेक किल्ले आहेत, यापैकी सर्व किल्ल्यांचा राजा अंतुर किल्ला आहे.

पहाण्याची ठिकाणे :
अंतुर किल्ला दुर्लक्षित असला तरी किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत. संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायचा असेल तर दोन ते तीन तास लागतात. किल्ल्याचा पहिला दरवाजा बराचसा शाबूत आहे. दरवाज्याच्या समोर एक दगडी तोफगोळा पडलेला दिसतो. हा दरवाजा दक्षिणोत्तर आहे. दरवाज्यातून वाट पुढे जाते आणि डावीकडे वळून दुसर्‍या दरवाज्यापाशी पोहोचते. हा दरवाजा बराच मोठा आहे. आतमध्ये पहारेकर्‍यांच्या देवड्या सुध्दा आहेत. हा दरवाजा पूर्व-पश्चिम आहे. इथून वाट काटकोनात वळून तिसर्‍या दरवाज्यापाशी जाते. हा दरवाजा सुध्दा दक्षिणोत्तर आहे. कमानीवर कमळपुष्पे कोरलेली आहेत. कमानीवर जाण्यासाठी आतल्या बाजूने पायर्‍याही आहेत. दरवाजाच्या उजवीकडच्या तटबंदी मध्ये पहारेकर्‍यांच्या देवड्या बांधलेल्या आहेत. याच्याच बाजुला दुसर्‍या दरवाज्याचा बुरुज आहे.
दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे जाणारी वाट एका बाजूला किल्ल्याची तटबंदी आणि दुसरीकडे किल्ल्याचा बालेकिल्ला यामधून पुढे जाते आणि ती डावीकडे वळते. पुढे किल्ल्याची तटबंदी आणि त्यात असणारे बुरुज दिसतात. हे सर्व पाहून समोरच्या वाटेने गडाचे पश्चिम टोक गाठायचे आणि डावीकडच्या कड्यात खोदलेली पाण्याची टाकी पहायची. इथे कातळात खोदलेली सात ते आठ टाकी आहेत. यापैकी एका टाकीमधील पाणी पिण्याच्या दृष्टीने योग्य आहे. हे सर्व पाहून पून्हा मागे यायचे आणि किल्ल्याचा बालेकिल्ला चढायचा. समोर दोन मोठे वाडे बांधलेले दिसतात. यांच्या वर घुमटीसारखा भाग ही आहे. एका वाड्याच्या वर जाण्यासाठी पायर्‍याही कोरलेल्या दिसतात. या वाड्याच्या मागे एक भलामोठा तलाव आहे. या तलावातील पाणी मात्र खूपच खराब झालेले आहे. या तलावाच्या एका बाजूला गोदी नावाचा दर्गा आहे. वाड्याच्या विरुध्द दिशेला तलावाच्या पलिकडे एक दरवाजा आहे. हा दरवाजा इथे बांधण्याचे प्रयोजन मात्र कळत नाही. दर्ग्याच्या मागे थोडेसे चढून गेल्यावर एक घुमटी लागते. घुमटीच्या वरच्या बाजूला एक भलामोठा वाडा आहे. याच्यावर चढण्यासाठी पायर्‍यांची सोय केलेली आहे. या वाड्याच्या मागे काही थडगी आढळतात.
हे सर्व पाहून किल्ल्याच्या विरुध्द टोकाला जाणारी दिशा धरायची. वाटेत एक घुमटी लागते. थोडे अंतर चालून गेल्यावर डावीकडच्या झाडीमध्ये काही वाड्यांचे अवशेष दिसतात. ते पाहून समोरच्या टोकाकडे सुटायचे. विशेष गोष्ट जाणवते ती म्हणजे या भागाला विभागणारी एक तटबंदीच इथे बांधली आहे. या तटबंदी मधून पलिकडच्या बाजूला जाण्यासाठी एक दरवाजा सुध्दा काढला आहे. यातून आत प्रवेश केल्यावर आपण गडाचे उत्तरेकडचे टोक गाठतो. हा भाग दगड, माती, चुन्याच्या तटबंदीने एवढा काही मजबूत केला आहे की इथे शिरण्याची कुणाला हिम्मतच होणार नाही. या भागात एक तोफ पडलेली दिसते. त्याच्या समोरच एक तटबंदी आणि मागचा बुरुज यामध्ये एक छोटीशी खोली सुध्दा आहे. बाजुलाच एक दरवाजा आहे. याच्या आतमध्ये पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. हा भाग म्हणजे गडाचे शेवटचे टोक. हे टोक आणि समोरचे पठार यात ५० फुटाचे अंतर असल्याने हे टोक तटबंदी आणि बुरुज यांनी भक्कम केलेले आहे. सध्या मात्र येथे एक पीर आहे. आत शिरल्यावर किल्ल्याचा बुरुज दिसतो. त्यावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. बुरुजावरुन समोरचे पठार आणि त्याच्या शेवटी असणारा डोंगर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
अंतुर किल्ला हा महाराष्ट्राच्या जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर बसलेला आहे. अत्यंत दुर्लक्षित असा हा परिसर अजंठा डोंगररांगेत येतो. इथे पोहचायचे म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील नागापूर गाव गाठावे लागते. चाळीसगाव - सिल्लॊड रस्त्यावर नागापूर गाव आहे. चाळीसगावपासून ४० किमी अंतरावर नागापूर येते. किंवा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड पासून नागापूर २० किमी अंतरावर येते. या नागापूर गावातून ३ किमी अंतरावर कोलापूर नावाचे गाव लागते. इथपर्यत नागापूर पासून पोहचण्यास पाऊण तास पुरतो. पुढे कोलापूर पासून किल्ल्याच्या पायर्‍या गाठण्यास दीड तास लागतो. कोलापूर गाव मागे टाकल्यावर दहा मिनिटात वाट डावीकडे वळते. इथून १५ मिनिटे चालल्यावर उजवीकडे एक मारुतीची मूर्ती लागते. या मूर्तीच्या समोरुन वाट डोंगराच्या डावीकडून पुढे सरकते. लक्षात ठेवण्यासारखी खूण म्हणजे ही वाट डोंगराच्या नेहमी डावीकडूनच पुढे जाते. पुढे एका डोंगरावर घुमटीसारखा भाग दिसतो. पण तिथे वर न जाता पुन्हा डोंगराला डावीकडून वळसा घालत वाट दरीपर्यंत येऊन थांबते. इथून अंतुरचे प्रथम दर्शन होते. दर्शन घेऊन पुन्हा अंतुरच्या दिशेने चालत सुटायचे. वाट किल्ल्याच्या समोर असणार्‍या पायथ्याशी येऊन पो्होचते. वर न चढता उजवीकडे जंगलात पठाराला डावीकडे ठेवत जाणारी वाट धरायची आणि १० मिनिटातच डावीकडे एक पहारेकर्‍यांची देवडी लागते. २ मिनिटातच गडाचा पहिला दरवाजा दिसतो. नागापूर पासून पहिल्या दरवाज्या पर्यंत पोहोचण्यास दोन ते अडीच तास लागतात.

राहाण्याची सोय:
किल्ल्यावरील मशिदीमध्ये १० ते १५ लोकांना रहाता येऊ शकते.
जेवणाची सोय:
जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय:
गडावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
नागापूरहून अडीच तास लागतात.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।