किल्ल्याचा प्रकार: वनदुर्ग
किल्ल्याची ऊंची: २२९० मीटर
डोंगररांग: कोल्हापूर
श्रेणी: मध्यम
जिल्हा: कोल्हापूर

प्राचिन काळापासून कोकणातून घाटावर जाण्यासाठी
अनेक घाटमार्गांचा वापर केला जात असे. या घाटमार्गांनी कोकणातील बंदरात उतरणारा
माल घाटावरील बाजारपेठांमध्ये नेला जात असे. या घाटमार्गांचे रक्षण करण्यासाठी
वेगवेगळ्या राजवटीत किल्ले बांधले गेले. कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणार्या
"काजिर्डा घाटाच्या" रक्षणासाठी मुडागड हा किल्ला बांधण्यात आला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील पडसाळी गावातून कोकणातील राजापूर जवळील काजिर्डा गावात हा
घाट उतरतो. पूर्वीच्या अनेक घाटांचे काळाच्या ओघात रस्त्यात रुपांतर झाले (उदा.
फोंडा घाट, आंबोली घाट, आंबा घाट इ.) परंतु काजिर्डा घाट अजून
त्याच्या मुळ स्थितीतच राहीला आहे. मुडागड किल्ल्यावर फारसे अवशेष नसले तरी तो
किल्ला पाहाण्यासाठी करावा लागणारा दाट जंगलातील ट्रेक फार सुंदर आहे.
इतिहास :
हा गड कोणी बांधला हे ज्ञात नाही. पण १७४८ च्या
पेशव्यांच्या कागदपत्रात याचा उल्लेख आढळतो. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात
तेव्हा वितुष्ट आले होते. त्यावेळी तुळाजीने पन्हाळा प्रांतावर हल्ले केले. त्याला
आळा घालण्यासाठी यसाजी आंग्रे व सावंतवाडीकर यांनी एकत्रितपणे मुडागडाला वेढा
घातला व गड जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
मुडागड हा किल्ला वनदुर्ग या प्रकारातील आहे.
घनदाट अरण्य हेच त्याचे बलस्थान असावे. या अरण्यानेच या गडाचा आता घास घेतलेला
आहे. दाट अरण्यात गडाचे अवशेष हरवलेले आहेत. गड असलेला डोंगर चढताना गडाच्या
तटबंदीचे कातीव चिरे ठिकठिकाणी पडलेले आढळतात. गडाच्या तटबंदीच्या भिंतीच्या
अखेरच्या अवशेषांवरुन आपला गडमाथ्याचा प्रवेश होतो. गडावर दाट झाडी माजलेली आहे.
अनेक वृक्षांच्या मूळात गडावरील वास्तूंचे अवशेष अडकलेले दिसतात. गडमाथा आटोपशीर
आहे माथ्याच्या टोकावरुन पडसाळी गावातील धरण, काजिर्डा
घाट व गगनगड पाहाता येतो.
पोहोचण्याच्या वाटा :
कोल्हापूरहून मुडागडच्या पायथ्याशी असणार्या
पडसाळी गावात जाण्यासाठी नियमित बसची व्यवस्था आहे. स्वत:च्या वहानाने जात असल्यास
कोल्हापूरहून कळे गावापर्यंत यावे. कळे गावातून एक रस्ता अणुस्कुरा घाटाकडे जातो.
या रस्त्याने १० किमी वरील बाजारभोगावे गाव गाठावे. या गावाबाहेर असलेल्या नदीच्या
पुलाच्या अलिकडे अणुस्कुराला जाणारा मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूने जाणारा रस्ता
पकडावा. या रस्त्याने किसरुळ - काळजवडे - पोंबुरे - पिसाळी - कोलीक यामार्गे
पडसाळी गावात जाता येते.(अंतर १८ किमी).
मुडागड घनदाड अरण्यात असल्यामुळे वाट सापडणे
शक्य नाही. त्यामुळे गावातून वाटाड्या घ्यावा. गावातील नदी ओलांडल्यावर
थोड्यावेळातच वाट दाट अरण्यात शिरते. तेथे एक बारमाही झरा आहे. याचे पाणी
पिण्यासाठी भरुन घ्यावे, कारण पुढे वाटेत / गडावर पाणी नाही. या
दाट अरण्यातून जातांना वाट चढायची आहे, पण
चढ सोपा(सुखद) आहे व झाडांच्या दाट सावलीमुळे चढण्याचा त्रास जाणवत नाही. साधारण २
तासात आपण गडाच्या पायथ्याशी येतो. तेथून खडा चढ चढून १५ मिनिटात गड माथ्यावर जाता
येते. पडसाळी गावातून मुडागड पाहून परत येण्यास साधारणत: ५ तास लागतात.
काजिर्डा घाटातून दिड तासात कोकणातील काजिर्डा
गावात उतरता येते. तेथून राजापूरला जाण्यासाठी (६५ किमी) बस सेवा आहे.
राहाण्याची सोय:
गडावर रहाण्याची सोय नाही, पण पडसाळी गावातील शाळेत १२ जणांची सोय
होऊ शकते.
जेवणाची सोय:
गडावर जेवणाची सोय नाही. पडसाळी व बाजारभोगावेतही
जेवणाची सोय नाही. जेवणासाठी जवळचे हॉटेल कळे(कोल्हापूरच्या दिशेने) किंवा करंजफेळ
गावात (अणुस्कुराच्या दिशेने) आहे.
पाण्याची सोय:
गडावर पाण्याची सोय नाही. गावातील नदीतून किंवा
जंगलातील झर्यातून पाणी भरुन घ्यावे.
No comments:
Post a Comment