Pages

सुधागड



सुधागड........

              ०१ ऑगस्ट, २०१० "दुर्गसखा"च पहिलं वर्धापनदिन. मकरंद, चेतन, सुबोध, मधुरा आणि अभिजीत या मित्रपरिवाराने अगदी कोवळ्या वयात जन्मास घातलेल्या या गोजीऱ्या बाळास आज वर्ष पूर्ण होणार होत. हे बाळ जन्मल तो गड होता "सुधागड". अर्थातच सर्वानुमते या बाळाचा पहिला वाढदिवस त्याच गडावर मोठ्या थाटामाटात साजरा करण्याच ठरलं. सर्वांना ऑनलाईन पत्रिका पोहोचल्या. वर्षभरात सर्वांनाच लळा लावणाऱ्या लाडक्या "दुर्गसखा"च पहिलं वर्धापनदिन साजर करण्याची सर्वांचीच खूप तीव्र इच्छा होती. पण काही अपरिहार्य खाजगी कारणांस्तव या रमणीय, मंगलमय सोहळ्यात ते सहभागी होऊ शकले नाहीत. तळ्यात मळ्यात करता करता अखेर माझ "सुधागड"ला जायचं निश्चित झालं.
                ११:३० - १२:०० च्या दरम्यान आम्ही सर्वजण खोपट बस स्थानकात भेटलो. हृषीकेश जरी ट्रेकिंगला येऊ शकणार नव्हता तरी त्याने प्रेमाने वाढवलेली आंब्याची महिना-दोन महिन्याची रोप अगदी आठवणीने आणून मकरंदकडे सुपूर्द केली. ठाण्यातील खोपट मधून कोंकणात पिंपलोळीकडे जाणाऱ्यां १२:३० च्या बसमध्ये आम्ही बसलो. तेही अश्या ऐटीत जणूकाही आमच्यासाठी धाडलेल्या पालखीतच आम्ही विराजमान होतोय. मी, मकरंद, सुबोध, मधुरा, अमेय आणि पूनम आम्ही खोपटहून निघालो. पनवेलला आशिष आम्हाला येऊन मिळणार होता. अभिजीत आणि चेतन बाईकवरून येणार होते. ठरल्या वेळेला एस.टी पनवेलला पोहोचली. ठरल्याप्रमाणे आशिष आला आणि साऱ्यांनी एकच गल्ला केला. आमच्या आनंदाच्या किलबिलाटाने परिवहन महामंडळाची एस.टी पूर्णतः हादरून गेली. सह्प्रवाशांची झोप उडाली. एक चिमुरडी उत्सुकतेने काय झालं...! ते पहात होती. अशा जल्लोषी वातावरणात ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने वाया गेलेल्या आमच्या मौलिक दोन तासांचा फारसा त्रास नाही झाला. ठरलं वेळापत्रक पार कोलमडल होत. आता एक गोष्ट निश्चित होती, किल्ला रात्रीच सर करावा लागणार होता.
              पावसाचा जोर वाढतच होता. एव्हाना आम्ही वाकण गाठलं होत. वाकणहून पाली फक्त ६-७ कि.मी., सुदैवाने वाकणहून पालीकरता लगेचच टमटम मिळाली. साधारण ०५:०० - ०५:३० च्या दरम्यान आम्ही "श्री बल्लाळेश्वर" चरणी दाखल झालो. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते. आधी पोटोबा कि विठोबा.....? जणू हा मोठा यक्ष प्रश्नच होता. पण मनोमन "श्री बल्लाळेश्वरा"ला नमन करून. आधीच बस दोन तास उशिरा पोहोचल्याने आता गड चढायला आणखी उशीर होऊ नये म्हणून सर्वानुमते आधी पोटोबाला तृप्त करून परतीच्या वेळेस "श्री बल्लाळेश्वरा"च दर्शन घेण्याच ठरलं. सर्वांच एकमत होताच सर्वांनी पाली बाजारपेठेतील हॉटेलात धाव घेतली. मस्तपैकी गरमागरम मिसळीवर ताव मारून, गरमागरम चहाचा आस्वाद.....आssहाहा.....
               पोटोबा तृप्त झाल्यावर सर्वजण थोड्याफार खरेदी करता बाहेर पडले. तोवर मी आणि आशिष हॉटेलात बॅगांजवळ बसून होतो. मग आम्ही टमटम करून पाच्छापुरच्या दिशेने रवाना झालो. थोड्याच वेळात "ठाकरवाडी" गाठली. पावसाला बरच उधाण आल होत. चेतन आणि काळू अद्याप आले नव्हते. नेटवर्क नसल्याने त्यांच्याशी काही संपर्कही होत नव्हता. अर्थात काळजी करण्याच तसं काही कारण नव्हत. पण तरीही अंधार खूप झाला होता आणि पालीहून ठाकरवाडीकडे येताना मध्ये रहदारी नव्हतीच. त्यामुळे वाट चुकण्याची किंवा काहीतरी अनिष्ट घडण्याची दाट शक्यता होती. सर्वजण चिंताचुर झाले होते. त्या दोघांची वाट पहात आम्ही शाळेजवळ बसून होतो. सर्वानुमते रात्रीच गड सर करायचं ठरलं. तेवढ्यात दूरवरून कसलातरी प्रकाश दिसला सोबत गाडीचा आवाजही झाला. सर्वांचे चेहेरे उजळले. पण उजळलेले चेहेरे मावळायला फारसा वेळ नाही लागला. दिसणारा प्रकाश चेतन आणि काळूच्या बाईकचा नव्हताच. ठाकरवाडीमध्ये रात्री मुक्कामाला आलेली ती शेवटची बस होती. मकरंदने पूर्वी किमान ७-८ वेळा तरी "सुधागड" सर केला होता. त्यामुळे वाट चुकण अशक्यच होत. तरीही सोबत मधुरा आणि पूनम असल्याने कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची कोणाचीही तयारी नव्हती. शेवटी सर्वानुमते वाटाड्या सोबत घ्यायचं ठरलं. मकरंद आणि सुबोध वाटाड्या घेऊन येईतोवर इकडे आमचे आनंदाचे चीत्त्कार, किंकाळ्या उठल्या. त्या किंकाळ्यांनी मकरंद आणि सुबोध भानावर आले. चेतन आणि काळू आल्याची वर्दी त्यांना पोहोचली. दोघेही धावतच आले. मिठया वगैरे गळेभेट झाल्यावर वाटाड्यासोबत गप्पागोष्टी करत आणि एकमेकांची खेचत खेचत आम्ही पुढे कूच केले.
                कोसळत्या पावसात अनपेक्षित रित्या घडणारा हा "नाईट ट्रेक". वाssह.... मी जाम खुश होतो. काय योगायोग म्हणावा बर....? सर्व "श्री बल्लाळेश्वरा"ची कृपा. आम्हाला वाटाड्या भेटला तोही "गणेश". जणू "श्री बल्लाळेश्वर"च आमच्या सोबतीला होता. निरव शांततेला भंग करत चहूबाजूंनी खळखळणारे धबधबे धो-धो बरसत होते. पण अंधारातून त्यांच दर्शन मात्र होत नव्हत. आणि गर्द झाडीतून शिळ घालणारे आणि त्यांच्या किलबिलाटाने सर्वांना आकर्षित करणारे माझे मित्रही आता दिसत नव्हते. तीच एक हुरहूर लागली होती. पण त्यांची कमतरता निशाचरांनी भरून काढली. रातकिड्यांच्या मैफिलीला रंग चढला होता आणि त्यांचे सूर आम्हाला सोबत करत होते. इतरवेळेस निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवणारा मी. पण आज खळखळणारे धबधबे आणि त्यातून उमटणारे शांततेला भंग करणारे ध्वनी कितीतरी जवळचे आणि हवेहवेसे वाटत होते.  पूनम नवखी होती. तिचा हा पहिलाच ट्रेक. थोड्या-थोड्या अंतराने विश्रांती घेत घेत आम्ही पुढे सरकत होतो. काही अंतर चालून गेल्यावर लोखंडी शिडी आली. लगेचच सर्वांनी आपापली पोज घेतली आणि हवेतसे फोटो काढायला सज्ज झाले.
शिडी चढून पुढे गेलो आणि.....असंख्य काजव्यांनी आमच स्वागत केल. मंद स्वःप्रकाशात लुकलुकणारे ते काजवे चांदण्यांनाही लाजवत होते. आणि क्षणात काही काव्यपंक्ती ओठी पुटपुटलो.....

काजव्यापरी...
असे माझ अस्तित्त्व....
मंद स्वःप्रकाशात चालताना
येई मज महत्त्व...

           भयान अंधारही तेव्हा हवाहवासा वाटत होता. अंधारातच थंड वाऱ्याची झुळूक अंगाला बिलगत होती आणि अंगावर हलकेच शहारे उमटत होते. पावसाच्या तुरळक सरी अंगावर झेलत बसलेले बेडूकराव दृष्टीस पडले, पण आमची चाहूल लागताच त्यांनी एक लांबउडी मारली आणि काळोखात कुठल्या तरी झाडोऱ्यात दिसेनासे झाले. अखेरीस ११:३० च्या सुमारास गणेश (श्री बल्लाळेश्वर) ने आम्हास सुखरूप गडावर पोहोचवले. समोरच दृश्य पाहून सर्वांचेच चेहेरे उजळले. समोर एक नवीन प्रशस्त वाडा बांधला होता. किमान ६०-७० जन आरामात झोपू शकतील इतका प्रशस्त. पण, दुर्दैवान ते मोहमयी स्मित फार काळ नाही टिकल. जुन्या वाड्यात प्रवेश करताच सारे व्यथित झाले. डोळ्यांतील अश्रू लपवित वाडा न्याहाळत होतो. वाड्याची बरीच पडझड झाली होती. वाड्याची दुरवस्था पाहून मन सुन्न झालं.
इकडे मधुरा, सुबोध, अभिजीत, अमेय आणि पूनम पोटापाण्याच्या तयारीला लागले. सोबत क्लिक्स असल्यामुळे चूल पेटवण्याचा त्रास वाचला. पण त्यातली गम्मत मात्र अनुभवता नाही आली. असो....आशिष आणि काळू भोराई देवीच्या देवळात झोपण्यासाठी जागा आहे का...? ते पाहून आले. शेवटी वाड्यातच राहण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या आधीच वाड्यात "युथ होस्टेल" अनुशक्तीनगरचा किमान ४० जणांचा ट्रेकर ग्रुप आला होता. त्यांना त्रास नको म्हणून आम्ही एका कोपऱ्यात आमचा तळ ठोकला. पोटापाण्याची तयारी चालू होती. तोवर मी, मकरंद, आशिष आणि चेतन ने आणलेल्या चटरपटरवर ताव मारला. तयारीला लागलेल्या पंचाला देखील देऊ केल. maggi होईतोवर आम्ही चौघांनी हातपाय मोकळे करून घेतले. तयार maggi घेऊन मधुरा हजर झाली. आणि पोटातले कावळे आणखीन जोरात ओरडू लागले. सारे त्या maggiवर अधाशीपणे तुटून पडले. maggi खाऊन झाल्यावर आम्ही झोपण्याची तयारी केली. मधुरा, सुबोध, अभिजीत, अमेय आणि पूनम पुन्हा उद्याच्या जेवणाच्या पूर्व तयारीला लागले. बर दिसत नाही म्हणून आम्ही मधुराने आणून दिलेल्या चार-पाच लसून पाकळ्या सोलून दिल्या. आता आम्ही झोपण्याची तयारी केली. सगळ्यांच्याच बॅगा भिजून आतील अंथरून भीजल होत. सुदैवाने प्लास्टिक कॅरीबॅगमुळे माझी ब्लॅंकेट आणि शाल वाचली होती. भात परतून आणि झालेला कचरा वगैरे आवरून इतर मंडळीही अंथरुणावर लवंडली..........
              सर्वांचा डोळा लागला होता. मला मात्र ओढ लागली होती, सुर्यानारायणाच्या दर्शनाची, त्याच्या सोनेरी किरणांत न्हाऊन निघणाऱ्या सुधागड आणि परिसराच्या अलौकिक सौंदर्याची. पाउस धो-धो कोसळत होता. वाड्याच्या अंगणात चांदण्यांच्या मंद प्रकाशात धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या तांडव नृत्याच मनोहारी दर्शन होत होत. कौलावर कोसळणाऱ्या पाऊससरींच्या संगीतमय वातावरणातच मनोमन श्री बल्लाळेश्वराला नमन करून डोळे मिटले.
               कधी डोळा लागला ते कळत न कळत तोच अंगावरची ब्लॅंकेट बाजूला सरली. समोर सुबोध उभा होता. उठा, महाराज! आता चहापाण्याच बघा! म्हणत त्याने आम्हाला उठवलं. गुणी बाळासारखे वेळ न दवडता आम्ही कॉफी तयार केली.  कॉफी करता करता आमच्या आधी आलेल्या त्या ४० जणांच्या ट्रेकर ग्रुपशी ओळख झाली. मस्तपैकी कॉफी आणि नाश्ता आवरून (नाश्त्यामध्ये त्या दुसऱ्या ग्रुपने दिलेले कांदेपोहे देखील होते....) सर्वांशी गप्पा मारायला आम्ही मोकळे झालो. दुसऱ्या ग्रुप मधल्या मावशी आमच खूप कौतुक करत होत्या. एवढ्या रात्री आम्ही गड सर केल्याच त्यांना खूप अप्रूप वाटत होत. रात्री एवढ्या उशिरा येऊनही जेवण वगैरे आटोपून आम्ही लवकर उठलो होतो. आणि विशेष म्हणजे कोणालाही आमचा काहीही त्रास झाला नव्हता. मक्या आणि मावशींचा सुसंवाद चालू होता. मी नुसताच ऐकत मध्येमध्ये छोटस स्मित करत होतो. मकरंदने दुर्गसखाची ओळख करून देताना "FRIEND OF FORT" हे वाक्य वापरलं. आणि दुर्गसखाच ध्येय स्पष्ट केल - "पर्यटनातून प्रबोधन".
               एकीकडे आशिषने आपल्या कॅलेग्राफिचा डेमो दाखवण्याची तयारी केली. मी, मकरंद आणि मावशींच लक्ष तिकडे वळवल. आणि आम्ही सर्वजण आशिषची कॅलेग्रफी पाहण्यात रंगून गेलो. एकापेक्षा एक सरस कलाकृती आशिषने साकारल्या.


             काल रात्री परतून ठेवलेला भात शिजवून वगैरे सर्व आवराआवर करून आम्ही सज्ज झालो......"सुधागड"च्या दर्शनाला. "युथ होस्टेल" अनुशक्तीनगरच्या ट्रेकर ग्रुपचा निरोप घेतला. आणि वाड्याबाहेर पाउल ठेवण्या आधी मनोमन त्या उद्धस्त वास्तूला, बल्लाळेश्वराला नमन केल. शिवरायांना आणि थोर मराठ्यांना मानाचा मुजरा करून वाड्याबाहेर पडलो. संपूर्ण रात्र मी ज्याच्या विचारात खर्ची केली होती. तो "सुधागड" आणि त्याची ती "पवित्र धरित्री" सोनेरी किरणांचा दीप प्रज्वलीत करून, हिरवळीची शाल पांघरून एखाद्या सुहासिनी सारखी आम्हाला सामोरी आली.

          सर्वप्रथम "आई भोराई"च दर्शन घेतलं. बाजूच्या परिसरात बऱ्याच समाध्या आहेत. काही वीरशिळा आहेत. तेथेच मंदिर परिसरात पादुका पहावयास मिळतात. गडावरून होणाऱ्या तेलबैला शिखराची हुबेहूब प्रतिकृती असलेली शीलाही पहावयास मिळते.


                    मंदिर परिसरात फिरत असताना उंचावरून कोसळणाऱ्या दुधाळ धबधब्यांच दर्शन कितीतरी मनोहारी होत. हवे तसे फोटो काढून झाले होते. आता महादरवाजाकडे कूच केले. स्वतःला दुर्ग आणि निसर्गप्रेमी म्हणवणाऱ्या काही अतिशहाण्या मंडळींनी निसर्गावर केलेल्या उपकारांना सोबत आणलेल्या पोत्यात भारत आम्ही निघालो. "जाऊ तिथे घाण करू" हा मंत्र यांच्या रक्तातच भिनलेला असतो का..? प्लास्टिक पिशवी, बाटली, गुटख्याचे पाउच, वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्यात होत्या. निसर्गाच्या प्रेमापोटी आम्ही हे सर्व अगदी हसतमुखाने करत होतो.

पायाखालून खळखळत धावणाऱ्या पावसाच्या पाण्याने आम्हाला थेट महादरवाजा पर्यंत नेवून पोहोचवले. हा महादरवाजा पाहिला कि किल्ले "रायगड"च्या महादाराजाची आठवण झालीच पाहिजे.

                ह्या वास्तूंमधील हरएक गोष्ट मला वेड लावते. प्रत्येक गोष्ट आई जिजाऊ, शिवराय आणि त्या मर्द मराठ्या मावळ्यांची साक्ष देते. त्या वास्तूशी एकरूप होऊन त्यातील अलौकिकतेचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घेतलाच पाहिजे. अशा वास्तूत हक्काने हवेतसे फोटो काढून झाल्यावर आम्ही पुन्हा वाड्याकडे कूच केले. मध्येच एखादी चिंबोरी नांग्या उचलून पुढेपुढे धावत होती, मोठमोठ्या वेली झाडावरून खाली झुकल्या होत्या आणि त्यांचे सुंदर झोपाळे तयार झाले होते. निसर्गनिर्मित त्या झोपाळ्यावर क्षणभर रमलो आणि बालपणीच्या आठवणींत हरवलो. "भोराई देवी" मंदिर परिसरात येताच "दुर्गासखा"ने एक उत्कृष्ट सेवाकार्य सुरु केले. अर्थातच "वृक्षारोपण".

               वाड्यात येताच सर्वांनी जेवणावर ताव मारला. एकाच ताटात जेवण्यातील गोडी, आपुलकी, जिव्हाळा......काही निराळाच त्याचा थाट असतो. एकत्र, एकाच ताटात जेवताना त्याची जाणीव झाली. जेवण उरकून सर्वांनी परतीची तयारी केली. परतीच्या वेळेस गडावर वास्तव्यास असलेल्या आजीबाईंना थोडीफार मदत करून निरोप घेतला.
               निसरड्या वाटेमुळे "टकमक टोक" पाहण्याचं मात्र राहूनच गेल. तरीही त्याने परतीच्या त्या प्रवासात आम्हाला दिलेलं दर्शन खूप विलोभनीय होत.
               पायथ्याशी येऊन पुन्हा गडाला त्रिवार मुजरा केला आणि मार्गस्थ झालो. आता ओढ लागली होती "श्री बल्लाळेश्वर"च्या दर्शनाची. कधी एकदा त्याची भेट होते आणि कधी त्याला डोळेभरून पाहतोय अस झालं होत. अखेरीस ती शुभ घडी आली आणि त्याच्या दर्शनाने तनामनातून निर्मळ भाव प्रकटले. सर्वजण मंदिरात प्रवेश करते झाले आणि "श्री बल्लाळेश्वरा"च्या सुंदर मूर्तीकडे पाहून मी नुसताच गुनगुनलो......

रूप पाहता सुंदर
सुखावले लोचन....
पाली गावात नांदतो
गौरीसुत गजानन...

मूर्ती असे हि ठेंगणी
रुंद शेंदूर चर्चित...
डोई शोभतो मुकुट
रत्न माणिक जडित..

नयनी शोभती हिरे
रूप किती हे साजिरे....
हाती मोदक घेउनी
उभे मूषक गोजिरे...

बाळ बल्लाळ आठवा
भक्ती मनात साठवा... 
- सुरज उतेकर

         "सुधागड" आणि "श्री बल्लाळेश्वरा"च्या दर्शनाने धन्य झालो आणि एक अमाप सुंदर अनुभव घेऊन परतलो.








No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।