किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: १६४० मीटर
डोंगररांग: डोंगररांग नाही
श्रेणी: मध्यम
जिल्हा: धुळे

सुरत - बुर्हाणपूर या व्यापारी मार्गावर लक्ष
ठेवण्यासाठी कोंडाईबारी घाटात रायकोट किल्ला बांधण्यात आला. तीन बाजूंनी तासलेले
कडे व रायकोट गावाच्या बाजूने असलेला नैसर्गिक खंदक यामुळे रायकोटचा किल्ला
नैसर्गिकरित्याच बळकट व अभेद्य आहे.
इतिहास :
रायकोट हा छोटेखानी किल्ला मुख्यत: व्यापारी
मार्गावर टेहाळणी करण्यासाठी बांधण्यात आला होता. अहिर राजांनी हा किल्ला बांधला.
या किल्ल्याचा आकार व घेर पाहाता यावर फारशी शिबंदी नसावी. या किल्ल्याचा इतिहास
उपलब्ध नाही.
पहाण्याची ठिकाणे :
रायकोट गावातून किल्ल्यावर जाताना दोन
डोंगरामध्ये तयार झालेल्या नैसर्गिक खंदकांच्यावर तटबंदीचे अवशेष दिसतात.
किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते, त्यामुळे
अनेक अवशेष नष्ट झालेले आहेत. किल्ल्याच्या पठारावर एक बुरुज व तलाव पहायला मिळतो.
किल्ल्याच्या तीन बाजूंना खोल दर्या व तासलेले उभे कडे आहेत. या दरीला माकडदरी
म्हणतात.
मोरकरंज गावातून किल्ल्यावर जाणार्या वाटेवर
दगडात खोदून काढलेल्या पायर्या आहेत. पायर्यांजवळच १० फूट * २० फूट आकाराची गुहा
आहे, पण ती रहाण्यास योग्य नाही. गडावरुन
माकडदरीचे अप्रतिम दृश्य दिसते.
पोहोचण्याच्या वाटा :
धुळे - सुरत रस्त्यावर कोंडाईबारी घाट आहे.
धुळ्याहून सूरतला जाताना घाटाच्या सुरुवातीला कोंडाईबारी गाव लागते, तर घाटाच्या शेवटी मोरकरंज गाव लागते.
या दोन्ही गावातून रायकोटला जाता येते.
१) कोंडाईबारी मार्गे:-
धुळे - सुरत रस्त्यावर धुळ्यापासून ७० किमी
अंतरावर कोंडाईबारी गाव आहे. या गावातून नंदूरबारला जाणार्या रस्त्याने ३ किमी
गेल्यावर डाव्या हाताला रायकोटला जाणारा फाटा लागतो. तेथून (४ किमी) - नवागाव (२
किमी) - लगडवाड (२ किमी) - रायकोट या मार्गे आपण रायकोट गावात पोहोचतो.
गावाबाहेरील हनुमान मंदीराच्या बाजूने कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने जीप सारखे
वहान जाऊ शकते. रस्ता जिथे संपतो, तिथे
पायवाट सुरु होते. ही पायवाट आपल्याला दोन डोंगरांमध्ये असलेल्या नैसर्गिक खंदकात
घेऊन जाते. हा खंदक चढून गेल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो. या पूर्ण वाटचालीत
आपण किल्ल्याच्याच उंचीवर असल्यामुळे, ट्रेक
अतिशय सोपा आहे.
२) मोरकरंज मार्गे:-
मोरकरंज गावातून माकडदरीमार्गे पायवाट व पुढे
किल्ल्याच्या वरच्या बाजूस असलेल्या दगडातून खोदून काढलेल्या पायर्या चढून
किल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. या वाटचालीत आपण पायथ्यापासून किल्ला चढून जातो.
राहाण्याची सोय:
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय:
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय:
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
१) रायकोट गावातून १ तास लागतो. २) मोरकरंज
गावातून २ तास लागतात.
सूचना :
१) पावसाळ्यानंतर लगेच आल्यास रायकोट गावाच्या
माळावर व किल्ल्यात असंख्य फुलपाखरे पहायला मिळतात. तसेच कोंडाईबारी ते रायकोटच्या
प्रवासात निसर्गाची विविध रुप दृष्टीस पडतात.
२) धुळ्याहून भामेर व रायकोट हे दोन किल्ले एका
दिवसात पाहाता येतात.
No comments:
Post a Comment